नाशिक - शेवटचा रूग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही, असे मत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकच्या ठक्कर डोम येथे 325 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले.
नाशिकमध्ये कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले सामाजिक संस्थांनी मदत करावी -
नाशिकच्या ठक्कर डोम येथे 325 बेडच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निर्मिती नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संस्थेने केली आहे. या ठिकाणी अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रूग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. त्यामुळे इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मनुष्यबळाची कमी -
गेल्यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोम कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा ही व्यवस्था बंद केली. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा हे कोविड सेंटर कार्यान्वित करावे लागत आहे. उपाययोजना करत असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण कमी पडत आहोत, ही वास्तविकता आहे. कोरोनाच्या या कामासाठी खासगी डॉक्टर्स, परिचारिकांनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले.
कोविड केअरमध्ये अत्याधुनिक सुविधा -
325 बेडच्या या कोविड केअर सेंटरमध्ये महिलांसाठी 125 बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधित रूग्णांची मानसिकता चांगली रहावी यासाठी योगा, मेडिटेशन, कॅरम, टीव्ही आदी मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चोवीस तास तज्ञ डॉक्टरांची टीम तैनात असणार आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा -लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्सची आज महत्वाची बैठक, काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष