नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून, तो नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाला देखील बसला आहे. लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय बंद असल्याने अनेकांना उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न पडला होता. त्याचा परिणाम पालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा जून महिन्यात घरपट्टी वसुलीत 13 कोटींची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम भविष्यात पालिकेच्या आस्थापना खर्च तसेच विकास कामांवर देखील होऊ शकतो.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने तीन महिने लॉकडाऊन जाहीर केला. या काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. तसेच राज्याच्या प्रशासकीय यंत्रणासोबत नाशिक महानगरपालिका यंत्रणेनेसुद्धा कोरोना प्रादुर्भाव कसा कमी करता येईल. कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार कसे होतील? यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पालिकेची 60 टक्के प्रशासकीय यंत्रांणा आजच्या घडीला अत्यावश्यक सेवा देण्यात व्यस्त आहे. त्यामुळे करवसुलीवर याचा परिणाम दिसून येत आहे.
शहरातील अर्थचक्र थांबल्याने सक्तीची करवसुली नाही -
नाशिक पालिकेला घरपट्टी, पाणीपट्टी आणि जीएसटीच्या कर माध्यमातून उत्त्पन्न मिळत असते. मिळणारे पैसे महानगरपालिकेचा आस्थापना खर्च तसेच शहरातील विकास कामांसाठी वापरला जात आहे. मात्र, लॉकडाऊन काळात शहरातील अर्थचक्र थांबल्याने तसेच हाताला काम नसल्याने अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. म्हणून मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात होणाऱ्या करवसुलीमध्ये मागील वर्षीपेक्षा मोठी तूट निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात व्यस्त असलेल्या पालिकेने सक्तीचे पाऊल उचलले नाही.