बागलाण (नाशिक) : सध्या देशात तिसरे लॉकडाऊन सुरु झाले आहे. मात्र, या लॉकडाऊन सर्वात जास्त फटका हा फळभाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांना बसत आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अनिल अहिरे या शेतकऱ्याला मोठ्या कष्टाने पिकवलेली वांगी उकिरड्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
दिवसरात्र कष्ट करुन पिकलेली वांगी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ हेही वाचा...गावकऱ्यांची गांधीगिरी.. चार महिन्यानंतर गावात अवतरलेल्या ग्रामसेवकाचे पाय धुवून केले स्वागत
बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील प्रयोगशील शेतकरी अनिल रामदास अहिरे यांनी आपल्या तीन एकरच्या क्षेत्रात आधुनिक पद्धतीने वांगी लागवड केली. यासाठी बियाणे, खते, औषध फवारणी, मजुर आदी बाबींवर सुमारे दोन लाख रुपये खर्च झाला. या शेतकऱ्याच्या मेहनतीला चांगले फळ आले. वांग्याचे पिक अगदी जोमात आले. मात्र, लॉकडाऊनमुळे मार्केटमध्ये अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे मालाला भाव मिळत नाही. तसेच शेतमाल बाजारात किंवा शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यात अडचणी येत आहेत. वांगी तोडण्याची मजुरी, वाहतूक खर्च लक्षात घेता. हाती काहीच येत नसल्याने आत्तापर्यंत झालेला खर्च माथी मारून घेत या शेतकऱ्याने अखेर वांगी जनावरांना खायला दिली आणि उकिरड्यावर फेकून दिली आहेत.
जांभळ्या वांग्याला गुजरात बरोबरच जळगाव, भुसावळ व धुळ्याकडे अधिक मागणी आहे. लग्न समारंभात या वांग्याचे भरीत खास पदार्थ म्हणून बनवला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आणि व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्याला हे नुकसान सहन करावे लागत आहे.