दिंडोरी(नाशिक)- दिंडोरी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशीरे यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हेक्सागॉन केमिकल कारखान्यात एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळला असून एव्हरेस्ट इंडस्ट्रीज कंपनी मध्ये सहा रुग्ण आढळले आहेत. अवनखेड येथील पॉलीजन्टा कंपनीत ३ रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. हे कर्मचारी नाशिक येथून कंपनीत कामावर येत होते. आरोग्य विभागाने हे कारखाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.कोशिरे यांनी सांगितले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिंडोरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुक्यात सर्वत्र कोरोना रुग्ण आढळत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुक्त म्हणून दिंडोरी तालुक्याला ओळखले जात होते. परंतु, आता मात्र तालुक्यात रग्णांबरोबर मृत्यूंची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढलीय.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिंडोरी तालुक्याने सर्व प्रथम आठवडे बाजार बंद केला होता. या तालुक्यात कडक उपाय योजना सर्वच ठिकाणी केल्या होत्या. शासनाने दिलेले लाॅकडाऊनचे सर्व नियम तालुक्याने काटेकोरपणे पाळून सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
काही दिवसांपूर्वी गावात जर एखादा रुग्ण सापडला तर ते गाव खबरदारीचा उपाय म्हणून सील केले जात होते. परंतु, आता मात्र गावात चार ते पाच रुग्ण सापडून तसेच कोरोनामुळे रुग्ण मृत्यू होऊनही गाव लाॅकडाऊनच्या नावाखाली सील होत नाही, अशी तालुक्यातील लोकांमध्ये चर्चा आहे.