नाशिकCorona Threat :देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्यानं केंद्राच्या आरोग्य विभागानं राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात तीनशे आणि जाकीर रुग्णालयात शंभर असे चारशे बेड राखीव ठेवले आहेत. आवश्यकता वाटल्यास 'आयटीपीसीआर' तपासणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा :केरळ राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या तब्बल 111 रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला धक्का बसलाय. त्यामुळे कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा हातपाय पसरू लागलेला दिसत आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नाही तर नागरिकांनाही आरोग्य विषयी समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपायांवर काम करून काही पर्यायी नियमावली व्यवस्था उभ्या कराव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.