महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची दुसरी लाट? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू

जिल्ह्यात सद्यस्थितीत दररोज 200 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असतानाचा पुन्हा नागरिकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

nashik
नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू

By

Published : Feb 18, 2021, 11:31 AM IST

Updated : Feb 18, 2021, 12:44 PM IST

नाशिक- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत दररोज 200 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असतानाचा पुन्हा नागरिकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात जवळपास दररोज 200 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत, त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू - आयुक्त
प्रशासन करणार नियम कठोरवाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासन नियम कठोर करणार आहे. तसेच शासकीय कार्यलयांमध्येही कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. जर रुग्ण संख्या अधिक झपाट्याने वाढली तर बंद करण्यात आलेले कोरोना केअर सेंटरदेखील पुन्हा चालू करण्यात येणार आहेत. याच बरोबर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील मनपा आयुक्तांनी दिले आहेत.कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कोविड सेंटर शहरातील बंद केले होते. शहरातील विविध खासगी रुग्णालयात तसेच शासकीय रुग्णालयात कोविड रुग्ण हे उपचार घेत आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात बेड रिक्त आहेत. पूर्वी कोरोना झाला की रुग्णाला लगेच अॅडमिट करून घेतले जायचे. मात्र, सध्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेत रुग्ण घरीच होम क्वारंटाईन होत बरे होत होते. त्यामुळे रुग्णालयातील बेड हे काही प्रमाणात रिकामे आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढत राहिली तर कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच शहरात पुन्हा एकदा कडक निर्बंध घातले जाणार असल्याचेही माहिती मनपा आयुक्त जाधव यांनी दिली आहे.
विशेष पथकाद्वारे केली जाणार कारवाई-
शहरातील गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने कोरोना नियम न पाळणार्‍या नागरिकांवर कारवाईसाठी विशेष पथक पुन्हा एकदा कार्यान्वित केले आहे. हे विशेष पथक मंगल कार्यालय, मॉल्स, लॉन्स, सभागृह, खुले मैदान, चौक या ठिकाणी नियम न पाळणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करणार आहे. या पथकामध्ये म.न.पा. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा
समावेश केला आहे, तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर थेट फौजदारी कारवाईसुद्धा केली जाणार आहे.

वर्ध्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू -

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या दर वाढीत राज्यात वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सायंकाळी 7 नंतर बाजार पेठ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आतापासून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वाशिम जिल्ह्यातही संचारबंदी-

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बुधवारी १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी राहील. पुढील आदेशापर्यंत मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

बुलडाण्यातही संचारबंदीचे आदेश-

जिल्ह्यात सर्वाधिक 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) 17 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती पाहता आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.


अमरावती विभागामध्ये परिस्थिती काहीशी गंभीर; निर्बंध कडक- अजित पवार

अमरावतीमधील कोरोना संदर्भात आज सकाळी आढावा घेण्यात आला आहे. अमरावीतसह यवतमाळ वर्धा या तीन जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कुटुंबच्या कुटुंब तिथे पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे यासंबंधी दुपारी साडेबारा वाजता बैठक आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊन साठी तीन शहरा पुरता निर्णय घ्यायचा किंवा इतर ग्रामीण भागापुरता निर्णय घ्यायचा यासंबंधीचे निर्णय होणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

Last Updated : Feb 18, 2021, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details