मनमाड(नाशिक)-जिल्हा रुग्णालयाकडे रविवारी सायंकाळी आलेल्या 72 अहवालापैकी एकूण 59 अहवाल हे निगेटिव्ह तर 11 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 2 अहवाल हे मनमाड शहरातले असून त्यात एक महिला आणि एका पोलिसाचा समावेश आहे.मागील आठवड्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच रविवारी पुन्हा 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे कळताच नागरिकांच्या चिंतेत भर पडली तर प्रशासना वरीलताण देखील वाढला आहे. आता शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 झाली आहे.
चिंताजनक...मनमाडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 3 वर - नागरिकांनी घरी थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन
मनमाड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 झाली आहे. नागरिकांनी आता तरी सावधानता बाळगावी, असे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.
शहरातील एका वयोवृद्ध महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णलायत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपजिल्हा रुग्णलायत पाठविले येथे तपासणी करण्यात आली असता त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसून आल्यामुळे त्यांचा स्वॅब पाठविण्यात आला होता. रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर दुसरा रुग्ण हा पोलीस असून मालेगाव येथे कर्तव्य बजावत होता त्याचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मालेगाव येथे कर्तव्य बजावत असलेल्या शहरातील 14 पोलिसांना शनिवारी मनमाड शहरात क्वारंनटाइन करण्यात आले. त्यांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता पुन्हा त्या 13 जणांची चाचणी करावी लागणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेला नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी आता विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.