नाशिक-मी कोरोनाबाधित झालो म्हणून समाज मला नाकारतो, अशी खंत जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टराने व्यक्त केली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली. यानतंर त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांना शासकीय यंत्रणेचा आलेला वाईट अनुभव त्यांनी व्हिडीओतून मांडला आहे.
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. त्यांनी अनेक चिमुकल्यांच्या मुलांच्या घशात अडकलेल्या वस्तू काढून त्यांना जीवदान दिले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा रुग्णालयात आपला मोठा सहभाग दिला आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात ठेवण्यात आले आहे. या संकटाच्या काळात त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणच्या शेजाऱ्यांचा आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेचा वाईट अनुभव आला.