येवला (नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असून काही बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी गावातील प्रभाकर चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या शेडमधील लाखो रुपयांची शिमला मिरची उपटून फेकली आहे.
बाजार समित्या बंद असल्याने चव्हाण यांनी 1000 कॅरेट पेक्षा जास्त शिमला मिरची मातीत फेकून द्यावी लागली आहे. प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या 2 एकर शेतात शेडमध्ये शिमला मिरचीचे पीक मोठ्या कष्टाने घेतले होते. पीक निघण्यास सुरुवात झाली आणि कोरोनाचे संकट आले. सर्वत्र टाळेबंदी झाल्याने भाजीपाल्याच्या बाजार समित्या बंद झाल्या. त्यामुळे शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळू लागला. अखेर या शेतकऱ्यापुढे एवढ्या कष्टाने पिकवलेली शिमला मिरची कशी विकावी आणि कुठे घेऊन जावी ? असा प्रश्न पडला. शेवटी निराश होत संतप्त शेतकऱ्याने 1000 कॅरेट पेक्षा अधिक शिमला मिरची उपटून फेकली आहे.