नाशिक - सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही पाहायला मिळत आहे. या विषाणूचा फटका मनमाडच्या आठवडी बाजारालाही बसला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी आठवडे बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे आपला विक्रीसाठी आणलेला माल कवडीमोल भावात विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली होती.
रविवारी मनमाडचा आठवडी बाजार भरत असतो. त्यात शहर परीसरा सोबत ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल घेवून येतात. तर फळे, कापड, चप्पल, खेळणी, यासह इतर दुकानदार देखील मोठ्या संख्येने दुकाने लावतात. आठवडी बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी शहरा सोबत पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी होते. भगतसिंग मैदान, शिवाजी चौक, कॉलेज रोड, इदगाह परिसर, जैन मंदिर परिसर, या भागात तर पाय ठेवण्यासाठी जागा नसते.
हेही वाचा -कोरोनाचा धसका : नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट
नेहमी प्रमाणे आज देखील आठवडे बाजारात व्यापारी, व्यावसायिक व दुकानदारांनी आपापली दुकाने तर थाटली होती. मात्र कोरोनाच्या भीती पोटी बाजारात नेहमी असणारी ग्राहकांची गर्दी नव्हती. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातलेला असून त्याची भीती इतकी पसरली आहे, की खबरदारीचा उपाय म्हणून शहरापासून ग्रामीण भागातील नागरिक देखील आता गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
कोरोनाचा आठवडी बाजराला फटका, मनमाडला ग्राहकांनी फिरवली पाठ खरेदीसाठी पाहिजे तेवढे ग्राहक न आल्यामुळे मातीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. आठवडे बाजारा सोबत शहरातील बाजार पेठेला देखील कोरोनाचा फटका बसत असून बाजार पेठेत रोज होणारी नागरिकांची रेल-चेल कमी झाली आहे. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांची चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू लवकरात लवकर देशातून हद्दपार व्हावा, अशी प्रार्थना व्यापारी, दुकानदारासह सर्वसामान्य नागरिक करत आहे.
हेही वाचा -कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला, यंदा प्रथमच 'या' परंपरेला छेद