नाशिक - लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. सद्यस्थितीत दिवसाला जिल्ह्यास १०६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून ८९ मेट्रिक टन रोजची गरज आहे. म्हणजे दिवसाची गरज भागवून १७ मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक राहत आहे.
नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या घडली.. ऑक्सिजनची मागणीही घटली
लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. सद्यस्थितीत दिवसाला नाशिक जिल्ह्यास १०६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून ८९ मेट्रिक टन रोजची गरज आहे.
दिवसाला १७ मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक -
एक महिन्यापूर्वी देशात कोरोना अँक्टिव्ह रुग्णात नाशिक प्रथम क्रमांकावर होते. पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजाराच्या पुढे गेला होता. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात ते आठ हजारांच्या घरात होती. त्यामुळे ऑक्सिजन बेडच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दिवसाला जिल्ह्यास १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. मात्र, शासनाकडून जिल्ह्यासाठी दिवसाला ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध केला जात होता. अतिरिक्त गरज भागविण्यासाठी नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून ऑक्सिजन मागवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. तरी देखील दिवसाला १०३ मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता होत होती. मात्र तरी पण ३२ मेट्रिक टनची कमतरता होती. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे प्राण देखील गेल्याच्या घटना घडल्या. मात्र लाॅकडाऊनमुळे परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.
ऑक्सिजनच्या मागणी १३५ मेट्रिक टनावरून ८९ मेट्रिक टनवर -
पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्येत घट होत असल्याने रुग्णालयात ऑक्सिजनच्या मागणीतही हळूहळू कमतरता येत आहे. दिवसाची गरज १३५ मेट्रिक टनहून ८९ मेट्रिक टनवर आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०६ मेट्रिक टन आँक्सिजन उपलब्ध होत आहे. दिवसाची गरज बघता १७ मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन शिल्लक राहत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.