नाशिक : कोरोनाचा कोलायट्रेड डॅमेज अर्थात कोरोनाच्या भीतीमुळे कॅन्सर रुग्णांच्या उपचारामध्ये विलंब झाल्याने पुढील वर्षभरात कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात 10 ते 15 टक्के वाढ होईल, अशी भीती प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ राज नगरकर यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम जेवढा नोकरी, उद्योगधंदे, व्यवसायावर झाला तितकाच परिणाम रुग्णांच्या उपचारावरही झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या चार ते पाच महिन्याच्या काळात अनेकांनी भीतीमुळे इतर आजारावर उपचार घेण्यास विलंब केला. त्यामुळे त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. ह्यात सर्वधिक परिणाम कॅन्सर रुग्णांवर होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
देशभरात कॅन्सर आजाराने दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. अशातच कोरोनाच्या भीतीमुळे कॅन्सर रुग्णांनी उपचारात दिरंगाई केल्याने त्यांच्या अडचणीत अधिक भर पडणार असल्याचे कॅन्सर तज्ज्ञाचे मत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींना कॅन्सरचे निदान होऊनही त्यांनी कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयात जाणे टाळले. तसेच ज्या रुगांवर उपचार सुरू होते मात्र, त्यांनी दिलेल्या वेळेत उपचार केले नाही अशांचा कॅन्सर आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ह्यामुळे पुढील वर्षभरात कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणत 10 ते 15 टक्के वाढ होऊ शकते, अशी भीती कॅन्सरतज्ज्ञ राज नगरकर यांनी व्यक्त केली आहे.