महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोरोना नियमांचे उल्लंघन, 4 लग्न समारंभावरील कारवाईतून 50 हजारांची वसुली

नागपुरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे प्रतिबंधात बदल करण्यात आले आहेत. ते मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नागपुरात 4 लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Nagpur
Nagpur

By

Published : Jun 28, 2021, 10:14 PM IST

नागपूर -कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नव्या नियमानुसार, नागपूरमध्ये सोमवारपासून (28 जून) प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील 4 लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच, त्यांच्याकडून ५० हजारांचा दंड वसूल केला आहे.

यापुढे कोणी नियम मोडू नये म्हणून कारवाई -

मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियमांमध्ये सूट देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा बेजबाबदारपणे वागणे सुरू केले होते. लोकांना नियमांची आठवण राहावी म्हणून आता पुन्हा महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. त्यामुळे यापुढे नियोजित असलेल्या लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांकडून नियमांचे पालन केले जाईल, असा यामागे उद्देश आहे. दरम्यान, आज मनपाच्या उपद्रव शोध पथकाने केलेल्या 4 पैकी 2 कारवाई धंतोली झोनमध्ये, तर हनुमान नगर आणि नेहरू नगर झोनमध्ये प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली.

कोरोना नियमांचे उल्लंघन -

पहिली कारवाई धंतोली झोन अंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर करण्यात आली. येथे लग्नसमारंभात १०० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कसुद्धा नव्हते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली सुरू होती.

या ठिकाणी कारवाई करून दंड वसूल

हा प्रकार निदर्शनात येताच सहाय्यक आयुक्त किरण बगडे यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथकाने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाला आणि लॉन मालकाला प्रत्येकी १० हजार रुपये असा २० हजारांचा दंड ठोठावला. याच झोन अंतर्गत दुसरी कारवाई चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभावर करण्यात आली. त्यांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक नियम तोडल्याप्रकरणी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तिसरी कारवाई हनुमान नगर झोन अंतर्गत असलेल्या मारकंडे सभागृहात करण्यात आली. अभिजित पराते यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर नेहरू नगर झोन अंतर्गत करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहात उपद्रव शोध पथकाने एकनाथ चामट यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मनपाच्या उपद्रव शोध पथकाने ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली.

हेही वाचा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत चार लाख लोक बाधित, लसींचे दोन डोस घेतलेल्या केवळ २६ जणांना बाधा

ABOUT THE AUTHOR

...view details