नाशिक - मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे. यातच कोथिंबिरीचे भाव गगणाला भिडले असून कळवण तालुक्यातील औत्यापाणी येथील कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल ३३१ रुपयांचा भाव मिळाला आहे.
गेल्या आठवड्यापासून कोथिंबीरीच्या दरात मोठी वाढ होत आहे. नाशिक बाजार समितीत कळवण तालुक्यातील औत्यापाणी गावातील काशिनाथ कामडी यांच्या कोथिंबिरीला प्रति शेकडा ३३ हजार १०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. त्यांनी आणलेल्या ३५४ जुड्यांना प्रति जुडी ३३१ रुपये दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कोथंबिरीचा दर २२ हजार रुपये प्रति शेकडा होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतिची कोथिंबीर आहे त्यांना आता सोन्याचा भाव मिळणार आहे.