नाशिक :नाशिकमध्ये मागील पंधरा दिवसापासून बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने, सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे. अशात 15 जून पासून शाळा सुरू झाल्या असून, मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यावे असा प्रश्न आईना पडला आहे. दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट देखील कोलमडले आहे. त्यामुळे महागड्या दराने पालेभाज्या खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. दोन महिन्यापूर्वी शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवला, तर काही शेतमाल फेकून दिला होता, भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी शेत मोकळे करून घेतले होते. त्याचा परिणाम आता मालाच्या आवकवर झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागड्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
कोथिंबीर 100 तर आद्रक 250 रुपये किलो : बाजारात कोथिंबीरचे दर 100 रुपये जुडीवर पोहचले आहे. तर अद्रकाच्या भावाने उसळी घेतली असल्याने, सर्वसामान्यांना आल्याचा चहा आता फिका वाटू लागला आहे. बाजारात आद्रक 250 रुपये किलो दराने विकले जात आहे. त्यामुळे आता 70 रुपये पाव किलो दराने अद्रक घ्यावी लागत आहे.
बाजारात आवक कमी:मागील दीड महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची बिकट अवस्था होती. टोमॅटोला दोन ते तीन रुपये किलो भाव मिळत असल्याने, बाजारात घेऊन जाण्यासाठीचा वाहतूक खर्च देखील परवडत नव्हता. तेव्हा अक्षरशः शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. अशीच परिस्थिती सर्वच भाज्यांची होती. आता खूप कमी शेतकऱ्यांकडे भाजीपाला शिल्लक आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे, परिणामी भाव वाढले आहे. आज कुठे शेतकऱ्याला दोन पैसे मिळत आहेत असे, किरकोळ भाजी विक्रेते गोविंद गायके यांनी सांगितले.