नाशिक -नायलॉन मांजा विक्रीविरोधात नाशिक पोलिसांनी धडक मोहिम सुरू केली असून ठिकठिकाणी दुकानांवर छापेमारी करण्यात येत आहे. यात दुकानदारांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. अशात नायलॉन मांजा दुकानात आढळल्यास, त्या दुकानाचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले.
नाशिक शहरात नायलॉन मांजामुळे एका महिलेचा बळी गेल्यानंतर नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहिम सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी दुकानांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली असली, तरी नाशिकमध्ये याची सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी मागील चार दिवसापासून ठिकठिकाणी दुकानांवर छापे मारून हजारो रुपयांचा मांजा जप्त करत मांजा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र यापुढे जर दुकानात नायलॉन मांजा आढळल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी जाहीर केले आहे.
हजारो रुपयांचा मांजा जप्त
नाशिक शहरातील भद्रकाली, पंचवटी भागात गुन्हे शाखेने कारवाई करत हजारो रुपयांचा मांजा जप्त केला. भद्रकाली आणि पंचवटी भागातील कारवाईत 78 गट्टे मांजाचे नग जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपी प्रशांत दिंडे आणि दानिश इसाक अत्तार या दोन विक्रेत्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, महेश कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नायलॉन मांजानिर्मिती करणाऱ्यांवर होणार कारवाई
शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असून या विरोधात आम्ही मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी या प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. यात नायलॉन मांजा जप्त करत त्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र फक्त दुकादारांवर कारवाई करून चालणार नसून नायलॉन मांजा निर्मिती करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी सांगितलं.
हेही वाचा -'औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न'
नाशिक : नायलॉन मांजा आढळल्यास दुकान परवाने रद्द करणार, पोलीस आयुक्तांची माहिती - नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई न्यूज
नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली.
नाशिक : नायलॉन मांजा आढळल्यास दुकान परवाने रद्द करणार, पोलीस आयुक्तांची माहिती