मालेगाव - कोरोनावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविल्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्नसमारंभावर नियंत्रण ठेवण्याबरोबर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज पोलीस प्रशासनास दिले आहेत. मालेगाव महानगरपालिकेत आयोजित सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते.
कोरोनावर मात करून मालेगाव शहराने नावलौकीक मिळवत मालेगाव पॅटर्न तयार केला आहे. मात्र गेल्या काही दिवसातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या चिंताजनक असून नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या त्रिसुत्रीचा अंमल करावा. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येत गर्दी होईल, असे समारंभ टाळण्यात यावे. लग्नसमारंभात शासनाच्या नियमानुसार अधिक गर्दी केल्यास आयोजकांसह मंगलकार्यालयाच्या मालकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून याची सर्वांनी दखल घ्यावी.