नाशिक(मनमाड) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले. मात्र, तरीही काही ठिकाणी अद्याप या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुका आरोग्य अभियाना अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मनमाड कोविड सेंटर समोर कामबंद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यानी दिला.
नांदगाव तालुक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनमाड येथे कामबंद आंदोलन - Nandgaon Contract Health Workers News
नांदगाव तालुका आरोग्य अभियाना अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मनमाड कोविड सेंटर समोर कामबंद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.

सध्या सरकार नवीन कर्मचाऱ्यांना भरती करणार आहे. त्यापेक्षा कंत्राटी कामगारांनाच कायम करावे. कंत्राटी कामगार आणि सेवेत कायम असणारे कामगार सारखेच काम करतात. त्यामुळे समान काम-समान वेतन लागू करावे. कोविड काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सरकरने विमा काढला आहे मात्र, त्याची मुदत 30 जूनपर्यंतच आहे. यापुढेही कोरोना महामारी सुरूच राहील त्यामुळे विम्याची मुदत वाढवावी, यासह इतर मागण्यांसाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मनमाड येथील कोविड सेंटर समोर कामबंद आंदोलन करत सरकारचा निषेध केला.
याअगोदर देखील रक्तदान करून अनोखे आंदोलन या कर्मचाऱ्यांनी केले होते. कोविड रुग्णालयात विना मास्क आणि विना ग्लोव्हज् काम करून निषेधही व्यक्त केला होता. मात्र, सरकारने अजूनही दखल घेतली नसल्याने आज पुन्हा कामबंद आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.