नाशिक- जिल्ह्यातील पुनंद पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज(मंगळवार) दोन तास झालेली बैठक निष्फळ ठरली. सटाणा शहरासाठी ३३ कि.मी पाण्याची पाईपलाईन टाकुन व्यवस्था व्हावी यासाठी ५५ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, पाइपलाइनद्वारे पाणी न नेता कालव्याद्वारे पाणी घेऊन जा, अन्यथा पाईपलाईन कोणत्याही बंदोबस्तात करा, पाईपलाईन शेतकरी उखडून टाकतील, असा इशारा कळवण, देवळा, सटाणा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
नाशिकच्या कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी कळवण येथे पुनंद धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी कळवणच्या शेतकऱ्यांकडून शेकडो एकर जमिनी घेण्यात आल्या. १२० एमसीएफटी इतका पाणीसाठा या धरणात होत असतो. आता याच धरणातून पाणी सटाण्यासाठी देण्याची वेळ आली आहे. सध्या कसमादे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी या धरणातून पाणी दिले जाणार आहे.