नाशिक - मालेगाव पॅटर्नचे नाव देशपातळीवर गेले असून त्यास आपण खरच पात्र आहोत. परंतु अद्यापही या संसर्गाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे भान ठेऊनच सण साजरे करा, आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (18 ऑगस्ट) केले आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील बालाजी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाचे संकट आजही कायम असून शासनाने सण, उत्सव साजरे करण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. यासाठी प्रशासनाकडून लागणारी सर्व मदत केली जाणार असून महानगरपालिकेमार्फत प्रत्येक प्रभाग निहाय गणेश मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांनी शासन आदेशानुसार मंडपाचा आकार व मूर्तीची उंची याची अंमलबजावणी करावी.
बोलताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे विसर्जनासाठी मिरवणूकीला प्रतिबंध घालण्यात आला असून त्याचे काटेकोर पालन करावे. प्रतिबंधीत क्षेत्रात कुठल्याही सार्वजनिक उत्सवास बंदी कायम असून प्रत्येकांनी घरात राहून सण उत्सव साजरे करावेत. ज्या मालेगाव पॅटर्नचे देशपातळीवर नाव गेले आहे. त्याच प्रमाणे सर्व धर्माचे लोक सामाजिक सलोखा राखून चांगल्याप्रकारे उत्सव साजरे करतात व कोरोनाचा फैलाव होणार नाही यांची काळजी घेतात, असे वातावरण आपल्याला यापुढेही कायम ठेवायचे आहे. या सर्व गोष्टींचे पालन करून आपण चांगल्या प्रकारे सण उत्सव साजरे करू, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंग म्हणाल्या, येणारे सण उत्सव साजरे करताना कुठल्याही प्रकारे नागरिकांची गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी. कोरोनावर चांगल्या प्रकारे मात करून आपण संपुर्ण राज्यात चांगला आदर्श घालून दिला आहे. सध्या शहरातील पश्चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोना कालावधीत गर्दी होणार नाही, यासाठी महानगरपालिका प्रशासनासह पोलीस प्रशासन संयुक्तपणे काम करणार आहे. नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही, प्रत्येक नागरिकांनी घरात राहून घरातच सण उत्सव साजरे करावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. जातीय सलोखा टिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. शासन आदेशानुसार मिरवणूकीवर पुर्णपणे बंदी असून सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंग यांनी यावेळी केले.