नाशिक - सामान्यपणे सापांना बेडूक आणि उंदीर खाताना आपण पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र, बुधवारी मनमाडमध्ये पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले. या कांद्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात आला होता. मात्र, सर्पमित्र सलीम शेख आणि विजय उगले यांनी कोब्राचे प्राण वाचवले.
मनमाड-मालेगाव राज्य महामार्गावर असलेल्या दहेगाव या ठिकाणी पप्पू रांका यांचा कांद्याचा खळा आहे. याठिकाणी नेहमीप्रमाणे कांदे भरण्याचे काम सुरू होते. काम करत असताना कांद्या चाळीच्या लोखंडी जाळीत एक साप अडकल्याचे कामगार महिलांच्या लक्षात आले. तत्काळ सर्पमित्र सलीम शेख आणि विजय उगले यांना फोन केला. शेख व उगले यांनी हा अत्यंत विषारी साप असल्याचे सांगितले. कोब्रा सापाने काहीतरी खाल्ल्याने त्याला चालता येत नव्हते. तसेच जाळीच्या तारेमुळे त्याला जखम देखील झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन्ही सर्पमित्रांनी कोब्राला व्यवस्थित बाहेर काढले.