नाशिक- महानगरपालिकेची महासभा आणि राडा हे जणूकाही समीकरणच झाले आहे. सोमवारी (दि.24 फेब्रुवारी) स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी बोलावण्यात आलेली विशेष महासभाही चांगलीच वादळी झाली. यावेळी सदस्य पदाच्या निवडीवरून भाजपचा अंतर्गत कलह यावेळी चव्हाट्यावर आला. तर दुसरीकडे शिवसेनेनं या निवडीवर आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
नाशिकमध्ये स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून राडा स्थायी समितीच्या निवडीसाठी काल विशेष महासभा बोलावण्यात आली होती. स्थायी समितीचा कार्यकाळ संपत आल्याने त्याची या महासभेत निवडप्रक्रिया होणार होती. मात्र, याचवेळी स्थायी समितीच्या सदस्य निवडीवेळी अनेकांची नाराजी समोर आली. नाराजीवरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. मात्र, भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. भाजपच्या यादीत नगरसेविका प्रियांका घाटे यांचे नाव जाहीर न झाल्याने त्यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला. पक्षातील निष्ठावंतांना डावलून सतत त्याच-त्याच लोकप्रतिनिधींना सत्तेची पदे दिली जातात असा, आरोप करत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
नगरसेविका प्रियंका घाटे यांना स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी डावलण्यात आल्याने महापौरांच्या 'रामायण' या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू करत गोंधळ घातला. भाजप पदाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तर दुसरीकडे पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे तीन सदस्य स्थायी समितीवर जाणे अपेक्षित होते. मात्र, महापौरांनी शिवसेनेच्या दोनच नावांची घोषणा केल्याने शिवसेनेने सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात न्यायालयात आक्षेप घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीवरून भाजपतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना येत्या काळात पक्षातील अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच, विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्य निवडीच्या आक्षेपाचाही सामना करावा लागणार आहे. दरम्यान, काल झालेल्या सदस्य निवडीत भाजपच्या सुप्रिया खोडे, राकेश दोंदे, हेमंत शेट्टी आणि वर्षा भालेराव या चार सदस्यांची तर शिवसेनेचे सुधाकर बडगुजर सत्यभामा गाडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन आणि काँग्रेसच्या राहुल दिवे यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीवरून सुरू झालेला हा वाद कोणत्या थराला जातो, हे बघणे महत्वाच ठरणार आहे.
हेही वाचा -मालेगावात २९ मार्चला राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन