नाशिक - गंगापूर रोड येथील इमारतीतील फ्लॅट धारकांनी एकजुटी दाखवल्याने फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालया पुढे झुकावे लागले. पाठपुरावा आणि संयम ठेवला तर न्याय मिळतो, अशी प्रतिक्रिया इमारतीमधी फ्लॅट धारकांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.
याबाबतच्या माहिती देताना ग्राहक महेश जोर्वेकर आणि वकील दिनेश रणदिवे. 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांनी आपल्या न्याय हक्कासाठी पुढे यावे, यासाठी ग्राहक संरक्षण विभागाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र, वेळ आणि पैसे जाऊनसुद्धा न्यायालयात लवकर न्याय मिळत नाही, अशी धारणा ग्राहकांची झाली असल्याने अनेक ग्राहक अन्याय झाल्यानंतरही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. मात्र, दुसरीकडे जागृत ग्राहक संविधानावर विश्वास ठेवून न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवतात, अशी अनेक प्रकरणे आहेत.
बांधकाम व्यावसायिकाने केली होती फसवणूक -
नाशिकच्या गंगापूर नाशिकच्या गंगापूर रोड भागातील मोडक नावाच्या बिल्डरने 2005मध्ये जयश्री ही इमारत बांधली होती. या इमारतीतील फ्लॅट विकताना त्याने ग्राहकांना फ्लॅटसोबत इन आउट गेट, कॉमन टॉयलेट, टेरेस आदी सुविधा देण्याचे मान्य केले होते. मात्र, कालांतराने या बिल्डरने आउट गेट तोडून तेथे भिंत बांधून इमारतीच्या आवारातील जागेवर मालकी हक्क दाखवला. तसेच कॉमन टॉयलेट आणि टेरेसला कुलूप लावून इमारतीमधील इतर सदस्यांना तेथे जाण्यास मज्जाव केला होता. बिल्डरकडून वारंवार होणाऱ्या अडवणूकीला कंटाळून इमारतीमधील सदस्यांनी ग्राहक संरक्षण विभागात दाद मागितली. न्यायालयावर दोन वर्षे या प्रकरणात सुनावणी चालली.
न्यायालयाने दिला निर्णय -
बिल्डिंग नकाशा आणि सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. यानंतर न्यायालयाने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला गेटच्या जागी बांधण्यात आलेली भीत आणि वाढीव बांधकाम तोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इमारतीचे टेरेस बिल्डिंग सदस्यांसाठी खुले करून देण्याच्या सूचना देत न्यायालयाने ग्राहकांना न्याय मिळवून दिला.
हेही वाचा -पालघर : जव्हारमधील आश्रमशाळेतील 38 मुलांना कोरोना संसर्ग; 3 तीन शिक्षकांचाही समावेश
एकजुटीमुळे मिळाला न्याय -
बिल्डरकडून वारंवार आमची अडवणूक केली जात होती. आउट गेटवर त्याने भिंत बांधून आमचा जाण्याचा रस्ता बंद केला होता. तसेच टेरेसलाही कुलुप लावले होते. तुम्हाला फक्त फ्लॅट विकला आहे. इमारतीच्या इतर गोष्टींवर तुमचा अधिकार नाही, अशी त्याची कॉन्ट्रॅक्टरची होती. त्याच्याविरोधात इमारतीचे आम्ही सर्व सदस्य एकत्र आलो आणि ग्राहक संरक्षण विभागात दाद मागितली. यानंतर दोन वर्षांनी का होईना पण आम्हाला न्याय मिळाला आहे. तसेच तुमच्यावर अन्याय होत असेल आणि तुम्ही न्यायालयात दाद मागितली तर न्याय नक्की मिळतो, यावर आम्हाला आता विश्वास बसला असल्याचे बिल्डिंग सदस्य महेश जोर्वेकर यांनी सांगितले.
बिल्डरकडून फसवणुकीचे प्रकार वाढले -
मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती बांधल्या जात आहेत. मात्र, काही बिल्डर्सकडून ग्राहकांना नाहक त्रास देत फसवणूक करण्याच्या घटना समोर येत आहेत. यात योग्य प्रकारचे बांधकाम नसले, बांधकाम क्षेत्र कमी देणे, फ्लॅटसोबत देण्यात आलेल्या सोयी सुविधांचे पालन न करणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत असल्याचे वकील दिनेश रणदिवे यांनी सांगितले. या तक्रारी आम्ही ग्राहक न्यायालयात मांडत असतो. काही प्रकरणामध्ये ग्राहकांच्या बाजूने चांगले निकालदेखील लागले असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. अजूनही ग्राहक संघटित आहेत. त्यात जागृती करण्याची गरज आहे. ग्राहकांनी आपल्या तक्रारी घेऊन ग्राहक न्यायालयात आल्यावर त्यांना न्याय मिळतो, असा माझा विश्वास असल्याचेही वकील रणदिवे यांनी सांगितले.
हेही वाचा -पोलिसांना कुत्रे म्हणणे अतिशय चुकीचे, अनिल बोंडेंवर कारवाई करा -हसन मुश्रीफ