नाशिक -सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांचा मृत्यू ही आत्महत्या नसून, तेलंगणा पोलिसांनी केलेली हत्या असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
सराफ व्यावसायिक विजय विरारी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सराफ व्यावसायिकांनी एक दिवसीय बंद पाळत चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी सराफ असोसिएशनच्या संदस्याची भेट घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बिरारी प्रकरणात तेलंगणा पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे. बिरारी यांना ताब्यात घेण्यापूर्वी स्थानिक पोलिसांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, हैदराबाद पोलिसांनी बिरारी यांना ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांनंतर पंचवटी पोलिसांना तोंडी माहिती दिली. ही संशयास्पद बाब आहे. विरारी यांच्यावर मागील वर्षी बायपास आणि गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी विश्रामगृहाच्या उंच भिंतीवरून उडी मारलीच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक पोलिसांना अंधारात का ठेवण्यात आले? यासह विविध प्रश्न आणि शंका त्यांनी उपस्थित केल्या. याबाबत पोलीस-आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा केली असून, पुण्यात सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी देखील बोलणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, उपाध्यक्ष मेहूल चोरात, सचिव गिरीश नवसे, राजेंद्र कुलथ, कृष्णा नागरे उपस्थित होते.