नाशिक: दानापूर-पुणे एक्सप्रेस मधून बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मुलांच्या तस्करीचा डाव रेल्वे पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी मंगळवारी रात्री प्रथम भुसावळ रेल्वे स्थानकावर 29 मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होताच त्याच गाडीत अवघ्या दोन तासात मनमाड रेल्वे स्टेशनवरही 30 मुले सापडली, याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ येथील एक तर मनमाड येथून चार अशा पाच मौलवींना रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना चांदवड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एका एनजीओच्या माध्यमातून मुलांना आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या मुलांना हिंदी ही बोलता येत नसल्यामुळे हे सर्व एकूण 59 मुले बिहार मधील आहेत की, बांग्लादेश आहे. याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
असा प्रकार उघडकीस आला: दानापूर- पुणे या रेल्वेच्या एस 10 या डब्यातून एक वकील पाठक हे प्रवास करीत होते. त्यांनी या मुलांना डब्यात पाहिले, त्या मुलांसोबत कोणीही नव्हते. त्या मुलांना भूकही लागली होती. वकील पाठक यांनी रेल्वे बोर्डाला ट्वीट करून मुलांचा फोटो व माहिती कळवली. त्याद्वारे रेल्वे बोर्डाकडून तात्काळ भुसावळ आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी शोध मोहीम राबवत मुलांची सुटका केली. तसेच शेवटच्या एका डब्यातून मौलानाला ताब्यात घेण्यात आले.
सर्व मुलांची जन्मतारीख 1 जानेवारीच: पोलीस व आरपीएफ ने ताब्यात घेतलेल्या सर्व मुलांच्या जन्मतारखा या 1 जानेवारी 2005, 1 जानेवारी 2006, 1 जानेवारी 2007, 1 जानेवारी 2008, 1 जानेवारी 2011, 1 जानेवारी 2012 अशा आहेत. त्या संशयास्पद असल्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या मूळ कागदपत्रांचा ही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या मुलांची तस्करी तर होत नाही ना असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.