नाशिक - चिकन खाल्यामुळे कोरोनाची लागण होते या अफवेमुळे पोल्ट्री उद्योगाचे महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांत एक हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. मात्र, आता ही अफवा दूर होऊन चिकनची मागणी वाढली आहे. तर आता उत्पादन नसल्याने ग्राहकाला एक किलो चिकनसाठी 200 ते 220 रुपये मोजावे लागत आहेत. या दरात पुढील काही दिवसात अधिक वाढ होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.
माहिती देताना नाशिक येथील आनंद अॅग्रो ग्रुपचे अध्यक्ष उद्धव आहेर चिकन खाल्यामुळे कोरोनाची लागण होते या एका समजुतीमुळे चिकन उद्योगाचे कंबरडे मोडले. दोन महिन्यापूर्वी 10 ते 20 रुपये किलोने चिकन विक्री करून सुद्धा विक्रेत्यांना ग्राहक मिळते नव्हते. काही ठिकाणी तर अक्षरशः फुकट कोंबड्या वाटण्यात आल्या. चिकनबाबत नागरिकांची भीती दूर व्हावी यासाठी अनेक ठिकाणी पोल्ट्री असोसिएशनने चिकन फेस्टिव्हलचे आयोजन केले. मात्र, हे सर्व करून सुद्धा चिकन विक्री होत नव्हती.
आता मात्र चिकनबाबत असलेला गैरसमज दूर झाला आहे. या काळात कोंबड्याच्या उत्पादनात 50 टक्के घट झाल्याने त्याचा परिमाण आता चिकनच्या किंमतीवर झाला आहे. सध्या जिवंत बॉयलर चिकनची कोंबडी 100 रुपयेपेक्षा अधिक दराने विकली जात आहे. किरकोळ बाजारात चिकन 200 ते 240 किलो या दराने विकले जात आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर नवीन अंडी उबवण्यासाठी ठेवली जातील. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पिल्लांच्या संगोपनासाठी पंचेचाळीस दिवस लागतील. म्हणजे मागणी इतक्या कोंबड्या बाजारात दाखल होण्यासाठी जुलै उजाडणार आहे. उत्पादन कमी होण्यामागे शेतकऱ्यांचे संपलेले खेळते भांडवल, पिल्लांच्या संख्येत केलेली घट, उन्हाळ्यामुळे कमी वजन मिळणे आणि कोंबड्यांना लागणारे खाद्य, अशी कारणे असल्याचे आनंद अॅग्रो ग्रुपचे अध्यक्ष उद्धव आहेर यांनी सांगितले.