नाशिक-ईद-उल-फितर तथा 'रमजान ईद' समाजामध्ये बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज मात्र जगावर आणि देशावर कोरोनाचे संकट ओढवले असून आपला 'कोरोना' विरुद्ध लढा सुरू आहे. आपण 'कोरोना'ला नक्कीच हरविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मुस्लीम बांधवांनी पवित्र ईदची नमाज आपल्या घरीच अदा करत प्रार्थना करून 'रमजान ईद'चा पवित्र सण साजरा करावा, अशा शुभेच्छा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पवित्र 'रमजान ईद' निमित्त राज्यातील जनतेला छगन भुजबळ यांच्याकडून शुभेच्छा - भुजबळ यांनी दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
सर्वांनी केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 'रमजान ईद' आनंदाने घरीच साजरी करावी, अशा शुभेच्छा छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लीम बांधवांनी सामाजिक भान ठेवत प्रार्थना व सर्व धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. त्याबद्दल शासनाच्यावतीने मुस्लिम बांधवांचे आभार भुजबळ यांनी मानले आहेत.
आजचा ईदचा सण देखील मुस्लीम बांधवांनी आपल्या घरात थांबूनच 'रमजान ईद'ची नमाज अदा करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र न येता साजरी करावी. तसेच 'कोरोना'चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.