नाशिक - ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. देशभरातील नागरिक या आंदोलनातून उतरले. हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण देणारे आंदोलन ठरले, असे वक्तव्य राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक संघटना, हुतात्मा फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
हुतात्म्यांची आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती- भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत आदरांजली अर्पण केली. यावेळी हुतात्मा स्मारकातील पदाधिकारी व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, '‘ऑगस्ट क्रांती दिन’ स्वातंत्र्याची नवी पहाट होती. गांधीजींनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. “आता कार्यकर्ता नाही तर नेता बना” असे आवाहन देखील गांधीजींनी देशातील नागरिकांना केले. या स्वातंत्र्य संग्रामाला हिंसक वळण लागले होते. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा करो या मरोचा लढा मानला जातो. इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देऊन चालते व्हावे, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकजण नेता झाला होता. स्वातंत्र्यासाठी ज्याला जे पटेल ते तो करत होता. क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली. अशा अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करतो'.