नाशिक -अब की बार २२० चा नारा लगावणाऱ्या भाजप सेना सरकारची मस्ती मतदारांनी उतरविली असून विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली आहे. राज्यात विरोधी पक्ष अधिक बलवान झाला आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष झाला असून आगामी काळात नाशिकचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस नव्ह तर शिवसेना व भाजपच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन विधानसभेत आवाज उठवू, असे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले.
राज्याचे भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षाच्या विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार राष्ट्रवादी भवन नाशिक येथे करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आघाडीतील विजयी उमेदवार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, सरोज आहेर यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. बाळासाहेब सानप, पंकज भुजबळ, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.तुषार शेवाळे, शिरीष कोतवाल, हेमलता पाटील यांना अपयश जरी आले असले तरी कोणीही हिंमत सोडू नका आणि पक्षाच्या कामासाठी सक्रिय व्हा असे आवाहन करत त्यांनी दिलेल्या कडव्या लढतीबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादी चांगली ताकद होती. मात्र, गेली अडीच वर्षे राजकीय षडयंत्रामुळे आम्हाला सरकारी पाहुणचार घ्यावा लागला. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड निसटली होती. राज्यातही परिस्थितीत बदलली होती. अशा कठीण परिस्थितीत सर्वाना सामना कसा करायचा याची ताकद पवार साहेबांनी दिली. त्यानंतर पक्षाने पुन्हा जोमाने काम करत नाशिक जिल्ह्यात समाधानकारक यश मिळवता आले. जिल्ह्यात गटतट विसरून सर्व लोक कामाला लागले होते. जिल्ह्यातील सर्व उमेदवार प्रामाणिकपणे लढले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळविता आले. या सर्वांना पवार साहेबांचे पाठबळ मिळाले त्यांनी राज्यभर मतदारसंघ पिंजून काढले. त्यातून राज्यातही चांगले यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष बनला आहे. पुढील काळात जिल्ह्यातील हे सर्व उमेदवार जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने लढा देतील. जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षभेद विसरून केवळ काँग्रेस राष्ट्रवादी नव्हते तर शिवसेना भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन एकत्र येत जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांची पत्रकार परीषद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यश हे कार्यकर्त्यांचे यश असून जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दिलेले यश आम्ही स्वीकारत असून सर्व मतदारांचे आभार त्यांनी मानले. ते म्हणाले आगामी काळात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका ज्या निवडणुका होतील, त्यासाठी आगामी काळात पक्षवाढीसाठी पक्ष बलवान करण्यासाठी जोमाने काम केले जाईल. तसेच राज्याच्या राजकरणावर टिपणी करतांना राजकारणात कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाला घेऊन सत्ता स्थापन करू शकते हे सांगता येत नाही. पुढील पाच वर्षात निश्चितच राजकीय उलाढाल होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.