नाशिक -किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी खरीप-रब्बी अशी अट रद्द करून केंद्र सरकारने सरसकट सर्व मका खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. यावेळी मका खरेदीबाबत केंद्र सरकारची भूमिका सकारात्मक असून खरीप मका खरेदीसाठी लवकरच परवानगी देण्यात येईल, असे रामविलास पासवान यांनी सांगितल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्र शासनास पत्र सुध्दा दिले आहे.
कोरोनामुळे घसरलेले बाजारभाव आणि नंतर भारतातील लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या बाजारपेठा या कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात खरीप मका पडून आहे. या मकेचे काय करावे, या विवंचनेत शेतकरी असल्याने मका पिकाचे कोसळलेले बाजारभाव पाहता केंद्र शासनाने ऑनलाइन नोंदणी व मका खरेदीसाठी रब्बी हंगामाची अट न ठेवता राज्यात शिल्लक असलेला सर्व मका सरसकट खरेदी करावा. अशी मागणी भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. राज्यात तालुका खरेदी-विक्री संघाला रब्बी हंगामाचा मका ऑनलाइन नोंदणी व खरेदीच्या प्राप्त झालेल्या आदेशानुसार खरीप मक्याची नोंद ग्राह्य धरली जाणार नाही.