येवला (नाशिक) Chhagan Bhujbal :गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केल्यानंतर, मराठा समाज भुजबळांवर नाराज असल्याचं चित्र आहे. याचा फटका आता भुजबळांना येत्या विधानसभेत बसू शकतो. दुसरीकडे, भुजबळांच्या येवला मतदारसंघात मात्र ओबीसी समाजाचा त्यांना पाठिंबा आहे.
मराठा समाजाचं साखळी उपोषण : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून ग्रामीण भागात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. येवल्यातील तहसील कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून हे आंदोलन सुरू असून, या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजानं येथे भजन आंदोलन, मुंडन आंदोलन, श्राद्ध आंदोलन असं विविध प्रकारचं आंदोलनं करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
ओबीसींचा विरोध : नाशिकमधील येवला लासलगाव हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ. येथे भुजबळांचा ओबीसी समाज मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करतोय. राजापूर येथे गेल्या चार दिवसांपासून ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करू नये, तसंच ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशा या आंदोलकांच्या मागण्या आहेत.