नाशिक - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगडावर कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांनी 'छबिना मिरवणूक काढली. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. भगवतीच्या चरणी नतमस्तक होत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी देवीला साकडे घालत मनोभावे देवीचा उदो उदो केला.
आदिमायेच्या दर्शनासोसाठी भाविकांची मोठी गर्दी
गडावरील शिवालय तलावावर स्नान करून सोबत आणलेल्या देवीच्या मूर्तींना शास्त्रोक्तपणे अभिषेक करत अर्धनारी नटेश्वर देवीचे पूजन करून छबिण्याला सुरुवात झाली. सप्तशृंगी माता, यल्लमा माता आदी देवींच्या मुर्तीस साज शृंगार करून, नैवेद्य, साडी-चोळी यांची छबिना मिरवणुक काढण्यात आली. शिवालय ते सप्तशृंगी देवी मंदीराच्या पहिल्या पायरीपर्यंत डफांच्या निनादात निघालेल्या या सवाद्य मिरवणुकीत भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या तृतीय पंथ्यांनी वाद्याचा तालावर ठेका धरत नृत्य केले.