नाशिक- जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांच्या विरोधात दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्यावरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल - नाशिक बातम्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची कुणकुण लागल्याने ते चार दिवसांपासून आरोग्य अधिकारी डेकोटे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
विजय डेकाटे यांनी आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याची पगारवाढ करून देण्यासाठी १० हजार रुपयाची लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली होती. तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर सापळा रचला होता. मात्र, याची कुणकुण लागल्याने डेकाटे यांनी रक्कम त्यावेळी स्वीकारली नव्हती. मात्र, त्यांनी सदर रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची कुणकुण लागल्याने ते चार दिवसांपासून फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सांगितले.