नाशिक - भाजपच्या महाजनादेश यात्रेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत समारोप झाला. यादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काहीच दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री पदाबाबत पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी पक्ष देईल ती जबाबदारी सक्षमपणे पेलू असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आज नाशिकमध्ये बोलताना पाटील म्हणाले, की सरकार आमचेच येणार आहे आणि देवेंद्र फडणीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे दिसते.