नाशिक : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि प्रशासनाने त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिकमध्ये गुन्हा दाखल : शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील सरकार बेकायदेशीर असून पोलीस, प्रशासन आणि जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असे वक्तव्य केले होतं. या संदर्भात मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार केदारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम 505/1 (ब) अन्वये पोलिसांप्रती अप्रितीची भावना व चिथावने (कायदा 1922) अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला. यावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. या निकालावरून शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट देखील एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.