नाशिक - राज्यात आंतरजिल्हा प्रवासास बंदी असतांना मुंबई येथून विना परवाना एक महिला टेंभे(वरचे) गावामध्ये पोहचली. दरम्यान ती कोरोनाबाधित आढळली असून तीचा मृत्यू झाला आहे. यावर कोरोनाचा फैलाव केल्या प्रकरणी व कोरोनाबाधित व्यक्तीला आश्रय दिल्या प्रकरणी एकूण सात जणांवर जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विना परवाना प्रवास अन् कोरोना फैलावास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल - Nashik Corona Latest News
कोरोनाचा फैलाव केल्या प्रकरणी व कोरोनाबाधित व्यक्तीला आश्रय दिल्या प्रकरणी एकूण सात जणांवर जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन चार दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथील महिला नाशिकच्या बागलाण तालुक्यातील टेंभे(वरचे)येथे आली होती. तीची प्रकृती बिघडल्याने येथून ती आपल्या मुला सोबत देवळा तालुक्यातील वासोळपाडा या गावी गेली. येथे तीची प्रकृती अधिकच खालावल्याने तीला पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
महिलेचा तपासणीसाठी पाठवलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली असून महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना विलनिकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या कोरोना चाचण्या घेण्यात येत आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये 50 वर्षीय महिला आणि 10 वर्षिय मुलाचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या सात व्यक्तींवर जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.