नाशिक- सिन्नर फाटा येथे गेल्या आठवड्यात हेल्मेट तपासणी मोहीम सुरू होती. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात पोलिसांनी काठी मारल्याची घटना घडली. याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड भागात राहणारा शुभम महाले आणि त्याचा भाऊ ओमकार महाले हे संगमनेरहून दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने येत होते. दरम्यान, सिन्नर फाटा भागात पोलिसांकडून हेल्मेट सक्ती मोहीम सुरू होती. यावेळी हेल्मेट नसल्याने आपल्यावर करवाई होईल, या भीतीने ओमकार महाले याने गाडी वळवून पळण्याचा प्रयत्न केला. अशात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या दिशेने काठी फेकून मारली. ही काठी गाडीवर मागे बसलेल्या शुभमच्या डोक्यात लागली आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.
असे असतानाही ओमकारने शुभमला संभाळत त्याला घरी घेऊन गेला. घडलेला प्रकार आईला सांगितला. यादरम्यान शुभमची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुभमची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला उपचारासाठी मराठा समाजाच्या मेडिकल रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, दोन दिवस उलटूनही अद्याप शुभम शुध्दीवर आला नाही. या घटनेची तक्रार देण्यासाठी शुभमचे कुटुंब नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिसांकडून असा कुठलाही प्रकार घडला नसून तुम्ही इथून निघून जा, नाहीतर तुमच्या मुलावर चोरीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देऊन शुभमच्या नातेवाइकांना तेथून काढून देण्यात आले होते.
या घटनेनंतर शुभमच्या नातेवाइकांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली. आयुक्तांनीदेखील या घटनेचे गांभीर्य ओळखून शुभमची रूग्णालयात जाऊन भेट घेत डॉक्टरांकडून त्याच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच पोलिसांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तब्बल ११ दिवसांनी काठीने मारणाऱ्या रवींद्र खोडे या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शुभमच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे.