नाशिक - मुसळधार पाऊस सुरू असताना, रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून सेल्फी घेणाऱ्या एकूण २४ जणांवर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने दिलेले आदेश न पाळता, केवळ थरार म्हणून स्वतःचा तसेच दुसऱ्यांचा जीवदेखील धोक्यात घालणाऱ्या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी दिलेले आदेश धुडकावत, बचावकार्यात अडथळा आणल्यामुळे भा. द. वि. कलम १८८ प्रमाणे या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये पंचवटी, गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी ६, म्हसरुळ पोलीस ठाण्यात ४ तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वाहतूक होळकर पुलावरून होत आहे. त्यातच 'पूर बघायला' आलेल्या लोकांनी बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे वाहतूकीस आणखी अडचण निर्माण होत आहे. याबाबत पोलीस विभागाने कलम 144 प्रमाणे प्रतिबंधक आदेश पारित केला असून, त्याचे पालन करून पोलीस विभागाला व नागरी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर (45,486 क्यूसेस), होळकर पूल (62,006 क्यूसेस), दारणा धरण (40,342 क्यूसेस), नांदूरमध्यमेश्वर धरण (29,1525 क्यूसेस), भावली धरण (2,159 क्यूसेस), आळंदी धरण (8,865 क्यूसेस), पालखेड धरण (67,706 क्यूसेस), चनकापूर (17,207 क्यूसेस), हरणबारी (9,157 क्यूसेस) आणि पुणेगाव (5,673 क्यूसेस) अशा प्रमाणात हा विसर्ग सुरू आहे.