नाशिक - निवडणुका म्हटल्या की प्रचार हा आपसूकच येत असतो. त्यात अलीकडे प्रत्येक उमेदवार नवनवीन फंडे वापरत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराचे अनोखे फंडे पाहायला मिळत आहेत.
प्रचाराचे विविध फंडे वापरून मतदारांना आकर्षित करण्याच प्रयत्न केला जात आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी प्रचारसभा, सायकलरॅली, प्रचार संगीत, लोकनृत्य, पथनाट्य अशा संस्कृतीक कलांचा आधार उमेदवार घेताना दिसून येत आहेत. धार्मिक स्थळ तसेच यात्रांना भेटी देत उमेदवार तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. मुस्लिम भागात उर्दू भाषेत खास शैलीत शायरीद्वारे मतदारांना आकर्षित केले जात आहे. महाविद्यालयात कार्यक्रमांना हजेरी लावली जात आहे. प्रचारासाठी आलिशान वाहनांचा वापर करण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना घेऊन प्रचाराच्या जाहिरातींवर उमेदवारांचा भर दिसून येत आहे. मतदारांना साकडे घालण्यासाठी नाशिकमध्ये भुजबळ कुटुंब मॉर्निंग वॉक करत आहे. तसेच तरुणांशी संवाद साधण्यासाठी आघाडीचे भुजबळ 'बोलू भाऊंशी' हा कार्यक्रम घेत आहेत.
भाजपकडून मोदींची साडी तर काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका प्रतिमेची साडी
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठल्याही निवडणूकीत उमेदवार कुठे आणि कसा प्रचार करतील याचा काही नेम नसतो. मतदार आपल्याकडे कसे आकर्षित होतील यासाठी नवनवीन प्रचार पद्धतीचा वापर केला जातो. यंदाच्या निवडणुकीतही अनेक फंडे पाहायला मिळाले. भाजपकडून मोदींची साडी तर काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका प्रतिमेची साडी कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचली. मुंबईत संजय निरुपम यांच्याकडून 'योग साधना बस रिक्षा' सारख्या सार्वजनिक साधनांचा वापर करत उर्मिला मातोंडकर मतदारसंघांमध्ये मिसळत आहेत. तर हेमा मालिनंकडून शेतातील गव्हाची सोंगणी असुद्या नाहीतर पार्थ पवारांचा लोकल प्रवास असे विविध फंडे वापरले जात आहेत.
प्रत्यक्ष भेटींवर भर
कधीही अडगळीच्या ठिकाणी न जाणारे नेते आणि उमेदवार चक्क त्या जागी जाऊन फोटोसेशन करण्यात दंग होताना आढळून येत आहेत. पाच वर्षातच प्रचार पद्धतीत झपाट्याने बदल झाला आहे. समाज माध्यमांवरील प्रचार मंदावला नसला तरी बल्क मेसेज आणि फोनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नाशिकमधील युतीचे उमेदवार थेट उमेदवारांच्या भेटी घेत आहेत.
प्रचारादरम्यान उमेदवार प्रसिद्धीसाठी एकही संधी सोडत नाहीत. वर्दळीच्या ठिकाणी जात मलाच मतदान करा यासाठी विविध प्रचार पद्धतीचा वापर करत आहेत. गाडीच्या खाली न उतरणारी मंडळी थेट जमिनीवर बसत गप्पा गोष्टी करताना दिसून येत आहेत. तर हवाई प्रवास करत शेतीतील शेतमाल पाहणारे चक्क शेतात काम करू पाहत आहेत. अशा प्रकारचे एक ना अनेक प्रचाराचे फंडे निवडणुकीच्या काळात पाहायला मिळतात. निकालाच्या वेळी स्पष्ट होईलच प्रचार कोणाच्या पथ्यावर पडतो ते. मात्र, सध्या तरी उमेदवार त्यांच्या प्रचार पद्धतीने चर्चेत कायम आहे.