महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य - मुख्यमंत्री - News about Chief Minister Uddhav Thackeray

राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी अपघात प्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासन प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

C M said priority of the government to set up a trauma care center in area of accident
अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

By

Published : Jan 30, 2020, 11:20 PM IST

नाशिक - राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. अपघात प्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. धुळे जिल्ह्याची आढावा बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार श्रीमती मंजुळा गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार डॉ. फारुक शहा, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, उर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी, महापालिका आयुक्त शेख आदिंसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -नाशिक विभागाची आज आढावा बैठक; मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची उपस्थिती

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील 1200 गावांचा पेसामध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आठ दिवसात केंद्र शासनाला सादर करण्यात येईल. साक्री येथील मोडकळीस आलेलया बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील. जलयुक्त शिवार अभियानाची जी कामे प्रगतीपथावर आहे तसेच जी कामे सुरू झाली आहेत, ती पूर्ण करण्यात येतील. धुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मालेगाव रस्त्यावर उड्डाण पुलाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. निम्न पांझरा, अक्कलपाडा धरण पूर्ण भरण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची अडचण लक्षात घेता हे धरण भरल्यानंतर त्याखालील धरण भरून जलसाठा वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पीकविमाचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन कंपन्यांशी चर्चा सुरू असून हा प्रश्न तातडीने सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागास दिल्यात. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनीही याबाबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे व शिरपूर हे महामार्गावरील महत्त्वाचे शहर असल्याने येथील आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत संबधितांना दिले.

हेही वाचा -नाशिकच्या देवळा येथील अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. धुळे शहरात 100 खाटांचे रुग्णालय मंजूर असून त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमआरआय मशीन खरेदीची आणि रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

बैठकीच्या सुरुवातीला देवळा तालुक्यात एसटी बस व रिक्षा यांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृह बांधकाम करणे, खरीप हंगाम 2018 ची नुकसान भरपाई मिळणे, पिंपळनेर तालुका निर्मिती अध्यादेश काढणे, 100 खाटांचे जिल्हा रुग्णालयात तातडीने सुरू करणे, जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणे, जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये मंजूर करण्याची मागणी करून त्यांच्या मतदार संघातील अडचणी व प्रश्न मांडले. त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने संबंधित विभागाच्या सचिवांशी चर्चा करून त्या सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details