नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात 23 प्रवासी प्रवास करीत होते. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया :नाशिक मधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
बस थेट घाटातील दरीत कोसळली :सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळल्यानंतर 1 महिला प्रवासी ठार तर 18 प्रवासी जखमी झाले आहेत. सप्तशृंगगड ते खामगाव (बुलडाणा) बस थेट घाटातील दरीत कोसळली आहे. या बसमध्ये 23 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर एक महिला प्रवासी मृत्यूमुखी पडली आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून पालकमंत्री दादा भुसे हे आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहे.
बसमध्ये 20 ते 25 प्रवासी : एसटी महामंडळाची बस सप्तशृंगीगडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वाणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.