नाशिक - शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक केल्याने कांद्याच्या भावावर नक्कीच परिणाम झाला आहे. अजूनही २० ते २५ दिवस हातात आहे. त्यामुळे, गर्दी न करता असलेला कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीला आणावा, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले.
या पुढील काळात कांदा उत्पादनाच्या योग्य नियोजनाची गरज असून आता कांदा उत्पादक नव्हे, तर कांदा उद्योजक म्हणून शेतकऱ्यांना पुढे येण्याची गरज असल्याचेही दिघोळे म्हणाले. दिघोळे यांनी आज अंदरसूल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपसमितीला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व बाजारभावाचा चढ-उतार याविषयी चर्चा केली. तसेच, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.