शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पोलीस अधिकाऱयांची प्रतिक्रिया नाशिक Bogus Teacher Recruitment Case :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी सेवा संस्थेसह महात्मा गांधी विद्या मंदिरात शिक्षक व एका लिपिकाची बोगस भरती प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महात्मा गांधी विद्या मंदिरातील संचालक मंडळातील 25 पदाधिकारी, सदस्य, 22 शिक्षक, 12 शिपाई, 6 लिपिक अशा 66 जणांवर तर आदिवासी सेवा समितीतील भरती प्रकरणी 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित जवळपास दोन्ही गुन्ह्यात सारखेच आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुवर यांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल केले आहेत.
शिक्षण उपसंचालकांकडून चौकशी :मिळालेल्या माहितीनुसार बोगस शिक्षक भरती प्रकरणाची शिक्षण उपसंचालकांकडून चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती-जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठीचे आरक्षणच्या कलम 4 मध्ये नमूद केल्यानुसार संस्थेने भरती करताना नियमांचं पालन केलं नाही. त्यानुसार संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष माजी मंत्री पुष्पा हिरे, उपाध्यक्ष पंडित नेरे, कोषाध्यक्ष स्मिता हिरे, सेक्रेटरी प्रशांत हिरे, जॉइंट सेक्रेटरी दीपक सूर्यवंशी, डॉ. अपूर्व हिरे, सभासद अद्वैत हिरे, प्रदीप सराफ, प्रशांत भार्गवे अशा जवळपास 66 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजकीय आकसाने कारवाई :महाराष्ट्रातील एक प्रामाणिक आणि सुसंस्कृत घराणे म्हणून हिरे कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यापासून सुरू असलेली कार्य सात दशकांना होऊन अधिक काळापासून 'बहुजन सुखाय, बहुजन हिताय' हे ब्रीदवाक्य जपलं जात आहे. कर्मचारी भरती व इतर प्रकरणात शासकीय यंत्रणाचा अवैधरित्या वापर करून नाशिक संस्था संचालक आणि विश्वस्त मंडळांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदवले गेले आहेत. राजकीय आकस ठेवून हे गुन्हे नोंदवण्यात आले आहे, असा दावा माजी आमदार आणि महात्मा गांधी विद्या मंदिराचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी केलाय.
शासनाचे लाखो रुपयांचे वेतन लाटले :आदिवासी सेवा संस्था व महात्मा गांधी विद्या मंदिरात या दोन्ही संस्था मोठ्या असून, जिल्हाभरात त्यांचे जाळे आहे. या संस्थांमध्ये शासनाची कोणतीही परवानगी नसताना शिक्षक भरती करण्यात आली. तसा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंजूर करण्यात आला. आदिवासी सेवा संस्थेत सात शिक्षक व एक लिपिकाची भरती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या संदर्भात बोगस पद्धतीने भरलेल्या शिक्षकांचे लाखो रुपयांचे वेतन देखील काढण्यात आले. वेतनापोटी मंजूर झालेला शासकीय निधीचा अपव्यय केला. भरती करताना सर्व शासकीय नियम पायदळी तुडवले गेले. म्हणून कलम 420, 406, 476, 471,34 अन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा:
- Gram Panchayat Bogus Recruitment Pune : 14 ग्रामसेवकांसह दोन कृषी विस्तार अधिकारी निलंबित
- जिल्हा बँकेतील २४ कर्मचारी बडतर्फ; फेरतपासणी होण्यापूर्वीच संचालक मंडळाची कारवाई
- Teacher Recruitment Case: शिक्षक भरती घोटाळा! विस्तार अधिकाऱ्यांना ईडी'ची नोटीस; 'ईटीव्ही भारत'कडून आढावा