नाशिक - कोरोना कळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांनी उचलल्याचे समोर आले आहे. अशा महाभागांनी या अडचणीच्या काळात आपल उखळ पांढरे करून घेतले आहे. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली असून, या अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 155 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 155 बोगस डॉक्टरांवर कारवाई
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला होता. नाशिक शहराबरोबर ग्रामीण भागात लाखो लोकांना कोरोनाची लागण झालीआहे. अशाच परिस्थितीत सरकारी हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटलही फुल होते. जिल्ह्यातील आरोग्य विभागही या कामात गुंतलेला होता. या गोष्टीचा फायदा घेत आदिवासी भागात डिग्री नसलेल्या अनेक बोगस डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करत आपले उखळ पांढरे करून घेतले. आता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणाने कारवाई सुरु करत जिल्ह्यातील 155 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे.
बाजारात मिळणाऱ्या ताप,सर्दी,खोकल्यांच्या गोळ्यांचा वापर
आरोग्य विभागाने सर्व तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. आरोग्यसेवा न पोहचलेल्या आदिवासी व दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. फेक डिग्रीच्या आधारे तात्पुरत्या दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष दाखवले जायचे व सर्दी, ताप, खोकला या मेडिकलमध्ये उपलब्ध गोळ्यांचा वापर या डॉक्टरांकडून केले जात होता. त्यात रोगाचे योग्य निदान होत असल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.