नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चत असते. यंदा रुग्णालयात मृतदेह अदला बदलीची घटना घडली. शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयामध्ये काल (२९ ऑगस्ट) सायंकाळी २ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक व्यक्ती नाशिकमधील तर दुसरी व्यक्ती भोपाळ येथील होती. या दोन्ही मृत व्यक्तींचे वय जवळपास सारखेच असल्याने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देताना जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून गडबड झाली. कर्मचाऱ्यांनी भोपाळच्या व्यक्तीचा मृतदेह हा नाशिकच्या नातेवाइकांना तर नाशिकच्या व्यक्तीचा मृतदेह हा भोपाळच्या नातेवाइकांच्या ताब्यात देऊन टाकला.
अंत्यविधीच्या वेळेस नाशिक येथील मृतदेहाचा चेहरा पाहिल्यानंतर नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेच जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनंत पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. मात्र, त्याच वेळी भोपाळ येथील नातेवाईक नाशिकच्या व्यक्तीचा मृतदेह घेऊन भोपाळच्या दिशेने रवाना झाले होते. आणि ते नातेवाईक धुळ्यापर्यंत पोहोचले होते. यावेळी दोन्हीकडील नातेवाइकांनी परस्पर फोनवर संपर्क साधत मध्यरात्री चांदवड टोल नाक्यावर मृतदेहांची अदलाबदल करून घेतली.
या प्रकरणामुळे दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी, मृतदेहाची ओळख परेड झाल्यावर रितसर नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आला होता. मात्र, रुग्णावाहिकामध्ये मृतदेह ठेवताना चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने हा प्रकार झाल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाने यांनी सांगितले.
हेही वाचा-धार्मिक स्थळे उघडण्यासाठी की, शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरायचे हे ज्याचे त्यानीच ठरवावे- राजू शेट्टी