नाशिक -मुंबई येथील 26/11च्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी नाशिकमध्ये शेकडो तरुणांनी गुरुवारी रक्तदान केले. वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून नाशिकमध्ये वुई फाउंडेशन आणि अर्पण रक्तपेढी यांच्या वतीने 2009पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदा कोरोनाचे सावट असून देखील मोठ्या संख्येने तरुणांनी रक्तदान केले.
शालिमार चौकातील सागरमल मोदी शाळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा परिसरात 26/11च्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचे बॅनर लावून भव्य रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या उपस्थितीत जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, व त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली.