नाशिक : राज्यातील मंदिरं उघडावीत, यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडीकडून आज (30 ऑगस्ट) सकाळी रामकुंडावर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात नाशिक, नागपूर, पुणे आणि पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे.
'मदिरालय सुरु मंदिर का बंद?'
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे मंदिर उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन राज्यभरात सुरू आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलन हे सुरू आहे. नाशिक, नागपूर आणि पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मदिरालय सुरु मंदिर का बंद? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आज पुन्हा मंदिराचे सर्व पुजारी आणि मंदिराच्या अवती-भोवती असणाऱ्या अनेक लहान-मोठ्या व्यवसायिकाना एकत्र करत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने नाशिकच्या रामकुंड परिसरात शंखनाद आंदोलन केले.
रामकुंडावर आंदोलन
'राज्यातील मंदिरे उघडावी यासाठी नाशिक मधील रामकुंड येथे धार्मिक आघाडी संत-महंत भाजप व नागरिकांनी घंटानाद-शंखनाद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन म्हणजे सरकारला पुढील पावले उचलली नाहीत तर एक इशाराच आहे' असे देखील भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितले आहे.
'मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे'
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरे राज्य सरकारने बंद केली. मधल्या काळामध्ये ही मंदिरे उघडली गेली. परंतु नंतर महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. या सर्व बाबींवर सरकारने मंदिरे उघडावीत हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी भाजपच्या धर्मिक आघाडीच्यावतीने सातत्याने वेगवेगळी आंदोलनं केली गेली. मागील आंदोलन त्रंबकेश्वर येथे केले होते आणि त्यानंतर वेरूळमध्ये आंदोलन केले गेले. या मधल्या काळात धार्मिक आघाडीच्यावतीने मंदिरे उघडावीत यासाठी निवेदन देखील देण्यात आले. परंतु त्याचा सरकारवर कोणताही परिणाम न झाल्याने आज (30 ऑगस्ट) सकाळी रामकुंड, पंचवटी येथे टाळ, घंटा व शंख वाजवून 'मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे' हा नारा देत भाजप प्रमुख धार्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
'अन्य राज्यात मंदिरे सुरु, महाराष्ट्रात बंद का?'
'मंदिरं उघडावीत यासाठी आम्ही सातत्याने मागणी केली. त्यावर उपजिविका करणाऱ्यांचे आज वाईट हाल होत आहेत. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणूनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आले आहे', असे भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'मंदिरं उघडा अन्यथा तांडव होईल', भाजपचं आज राज्यभर शंखनाद आंदोलन