नाशिक - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात नेत्यांचा पक्ष प्रवेश होत असताना, या प्रवेशावर टीका करण्यासाठी नाशिक मध्ये 'भाजपमध्ये प्रवेश देणे असल्याचे' फलक गंगापूर रोड परिसरात पाहायला मिळाले आहे.
भाजपला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच नाशकातील हे फलक चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, हे फलक विरोधकांनी लावले की या पक्ष प्रवेशाला कंटाळलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, या वरून राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे.