नाशिक - भाजपाकडून वाढीव वीज बिलाबाबत आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या रविवार कारंजा भागात करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यानी वाढीव वीज बिलाची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
नाशकात भाजपाकडून वाढीव वीजबिलाची होळी
भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यानी वाढीव वीज बिलाची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
राज्यभरात वाढीव वीजबिलासंदर्भात भाजपकडून सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. वाढीव वीज बिल माफ करावे अशी मागणी करण्यात येत आहे. नाशिकमध्ये देखील रविवार कारंजा भागात भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. ह्यावेळी कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलाची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार नागरिकांची मुस्कटदाबी करत असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतेय -
आज आम्हाला आंदोलन करण्यासाठी फक्त पाच लोकांची परवानगी देण्यात आली आहे. मागेसुद्धा आम्ही आंदोलन केले तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर चैप्टर केसेस दाखल केल्या होत्या..सरकार पोलीस प्रशासनाला पुढे करून विरोधी पक्षांचे आंदोलन चिरडण्याचे काम करत आहे..वाढीव वीज बिलाबाबत आंम्ही मुख्यमंत्री,ऊर्जा मंत्री राज्यपाल यांना निवेदन देऊन वाढीव वीज बिल कमी करण्याची विनंती केली होती मात्र सरकारने ह्यावर कुठलाच निर्णय घेतला नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागत आहे..मुख्यमंत्री घरात बसून जनतेची गंमत बघण्याचे काम करत असून सरकार जनतेला वाऱ्यावर सोडत आल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.