नाशिक - भाजपमध्ये चमचे टोळके कार्यरत आहेत. त्यांनी माझ्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, अशी अप्रत्यक्ष टीका खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. जे संकट मोचन म्हणून महाराष्ट्रभर मिरवत आहेत. तेच भविष्यकाळामध्ये मुख्यमंत्र्यांचे संकट होऊ नये याची भिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापासून सांभाळून राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नाराज झालेले चव्हाण यांच्याकडे भूमिकेकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता तिकीट मिळाले तरी घेणार नसल्याचे ते म्हणाले.